tgoop.com/vpkalesahitya/1316
Last Update:
*प्रिय पार्टनर.......,*
खूप घाई केलीत तुम्ही जायची
असं मी कधीच म्हणत नाही कारण
"मरावे परी किर्तीरूपे उरावे" ह्या म्हणीत बसणारे तुम्ही...
ह्या जगातून शरीराने गेलात
पण हळव्या मनामध्ये......
कायम जिवंत राहिलात आणि इथून पुढेही रहाल.आयुष्यात चालताना खाचखळगे येवो किंवा चौपदरी हमरस्ता तुमच्याशी संवाद ठरलेला. ज्या अडनिड्या वयात आईबापाने लेकराला सावरायचं असतं. त्याच वयात एकटी पडले आणि लायब्ररीच्या कपाटात तुमची ओळख झाली. तुम्ही *दोस्त* झालात शब्दाशब्दातून दुनियादारी शिकवलीत. तुमच्यामुळेच *तप्तपदी* वाटणारी *ही वाट एकटीची* *गुलमोहोर* झाली.
*घर हरवलेली माणसं* माझ्यासारखी बरीच जणं हक्काच्या *प्लेजर बॉक्स* मध्ये व्यक्त झाली आम्ही करंटे ते भाग्य नाही लाभलं.पण तरीही तुम्ही सतत प्लेजर देत राहिलात. *मी माणूस शोधतोय* म्हणत अनेक माणसांच्या मनात अधिराज्य केलंत.त्यांचे *रंग मनाचे* अचूक ओळखत आयुष्याची *रंगपंचमी* केलीत. *आपण सारे अर्जुन* म्हणत संसारसागरात भरकटणाऱ्या असंख्य तारुनां दीपस्तंभ बनून दिशा दाखवलीत. तुमचे शब्द जरी कागदावर उमटले असले तरी ते मनांनावर कोरले गेले. कित्येकदा मानसोपचारतज्ञ होऊन ढळत्या मानसिकतेला सावरलं ते केवळ आणि केवळ तुमच्या जगण्याच्या दृष्टीकोनाने.
"मला कापरासारखं जळणं आवडत नाही ह्याच कारण मागे काही उरत नाही, राखेच्या रुपात का होईना मागे काही तरी रहायला हवं.कारण राखेतून काहीतरी निर्माण होण्याची आशा असते."
किती समर्पक आशा होती तुमची
तीच राख कपाळी लावून अस्वस्थ मनाला सांभाळण्याचं शिवधनुष्य पेलतेय .जोपर्यंत मन नावाची ठिणगी अस्तित्वात आहे तोपर्यंत पृथ्वीतलावरचं तुमचं स्थान अबधित आहे वपु.
भावपूर्ण आदरांजली पार्टनर🙏🏻🌷
राणी मोरे....रोहा रायगड
BY वपु काळे साहित्य ™
Share with your friend now:
tgoop.com/vpkalesahitya/1316